औरंगाबादमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

औरंगाबाद : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील अजिंठा येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शनिवारी हा प्रकार घडला.  चिमुकलीला शॅम्पू आणून दे, असे सांगून तिला घरात बोलावून नराधमाने हे कृत्य केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी,  पाच वर्षीय चिमुकली आणि आरोपी हे दोघेही शेजारी-शेजारीच राहतात. आरोपीच्या घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. हीच संधी साधत आरोपीने शेजारील चिमुकलीला तिच्या आईसमोर शॅम्पू आणण्यासाठी बोलावले. तिने शॅम्पू आणून दिल्यावर आरोपीने घराचे दार लावले व तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या आईला मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने लगेच दार ठोठावला पण आरोपीने बराचवेळ दार उघडले नाही. मुलीला त्याच अवस्थेत सोडून मागील दारातून आरोपी पळून गेला.

चिमुकलीच्या आई-वडिलांनी आरोपीविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काल रात्री अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील वैद्यकीय तपासणी आणि डीएनए रिपोर्टसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय मराठे, पोलिस निरीक्षक अजीत विसपुते, अक्रम पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेनंतर काही वेळातच पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Share