औरंगाबाद : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून केंद्र सरकार मार्फत अत्यंत महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री मातृ वंदना ची अमलबजावणी सुरु आहे. औरंगाबाद जिल्हयात आज पर्यंत एक लाख 1 हजार 622 महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ देण्यात आला असून 41 कोटी 94 लाख 51 हजार इतका रक्कमेचे निधी लाभार्थी मातेच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. जिल्हयाने राज्यस्तरावरुन दिलेल्या उद्दिष्टाच्या 115 टक्के काम पुर्ण केले आहे. पीएमएमव्हीवाय कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. रेखा भंडारे यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
1 जानेवारी 2017 रोजी पासून प्रधान मंत्री मातृ योजना राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना असून यामध्ये पहिल्या बाळाकरीता गरोदर मातेस बुडीत मजूरीचा लाभ म्हणून 5 हजार रुपये देण्यात येतात. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत 1 लाख 1 हजार 622 महिलांच्या खात्यांमध्ये निधी जमा झाला आहे. या योजनेतून पहिल्या अपत्यासाठी गरोदर मातांना पाच हजार रुपांची मदत तीन टप्प्यात अदा केली जाते. पहिल्या टप्याकात गरोदरपणाची 150 दिवसांच्या आत नोंदणी केल्यास 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर पंरतु किमान गरोदरपणाची एक तपासणी झाल्यानंतर 2 हजार व तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या हप्ता बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर बाळाला 14 आठवड्या पर्यंत किमान बी.सी.जी, पोलिओ, पेन्टाव्हॅलेंट आणि हिपॅटायटीसचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर 2 हजार रुपयांचा अखेरचा टप्पा दिला जातो. या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पध्दतीने (Direct Beneficiary Tranfer मार्फत) त्यांच्या वैयक्तिक बँक, पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येतात. सदर योजना सध्या ग्रामीण क्षेत्राबरोबरच नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायात आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरीत पात्र लाभार्थीनी सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क करुन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी केले आहे.