मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना आलेल्या धमकीची माहिती गृहविभागाकडे आली आहे. याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. संबंधितांना पुरेशी सुरक्षा दिलेली आहे. वाटल्यास अजून सुरक्षेत वाढ केली जाईल, अशी माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
तसेच “हनुमानाचा जन्म अंजनेरीला झाला की किश्कंदला झाला हा वाद अनावश्यक आहे याला फार महत्त्व देऊ नका,” अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनावले आहे. दरम्यान महागाई, बेरोजगारी, टंचाई यासारखे अनेक प्रश्न देशासमोर आहेत याकडे लक्ष द्या असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज सगळे ठरवून चालले आहे. जे विषय देशासमोर नाहीत ते विषय काढून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम जन्म आणि हनुमान जन्म कुठे झाला. हा विषय आजचा नसल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री बदलाची चर्चा नाही
मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा महाविकास आघाडीमध्ये नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे पाच वर्षाकरीताचे पूर्ण काळ मुख्यमंत्री म्हणून राहतील. याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील याबाबत सातत्याने महाविकास आघाडीने सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाबाबतचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही.