औरंगाबाद : दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कालच गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ झाली. ज्यामुळे गॅस सिलेंडरचे दर १ हजार पार गेले आहेत. याचाच फटका आता खवय्यांना देखील बसणार आहे. कारण गॅसच्या किंमती वाढल्यामुळे औरंगाबादेतील हॉटेलमधील जेवण आता महागणार आहे.
कोविडच्या नंतर विविध वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे औरंगाबादकराचे हॉटेलिंग महागणार असल्याच्या माहितीला औरंगाबाद हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, कोविडनंतर आमच्या जवळपास ९० टक्के व्यवसायांवर वाईट परिणाम झाला आहे. हा उद्योग चालवणे जिकिरीचे बनले आहे. सर्वच वस्तुंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय चालवणे आम्हाला परवडेनासे झाले आहे. पेट्रोल, डिझेल, भाज्या, नॉनव्हेज या आमच्याशी संबंधित सर्वच वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. आता व्यापारी गॅस सिलिंडरच्या दरात (२३५५ रुपये) वाढ झाली आहे. याआधीही या किंमती सिलेंडर मागे २६८ रुपयांनी मागच्याच महिन्यात वाढल्या होत्या. कोळसा, भाज्या, लिंबू यांचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे आम्हाला जेवणाच्या दरात २० ते २५ टक्के वाढ करावी लागणार आहे.