रत्नागिरीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

मुंबई : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महाविद्यालसास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ४३० रुग्ण खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

रत्तागिरी शहर हे कोकणातील उच्चशिक्षणाचे देखील प्रमुख केंद्र आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग ग्रामीण असून सुमारे १७ लाख लोकसंख्या आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येला वैद्यकीय सुविधा देण्यासाठी रुग्ण खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याची वैद्यकीय व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. कोकणात नारायण राणे यांच्या संस्थेने वैद्यकीय महाविद्याल सुरू केले असताना शेजारील रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. प्रत्येक मंत्री आपल्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आग्रही असतात. प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय महाविद्यालय उभारण्याची योजना आहे.

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने सुरु असलेले उपक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असून वैद्यकीय महाविद्यालयामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share