आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

मुंबई :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. जाधव यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बॉटल आणि स्टम्प सुद्धा आढळून आल्या आहेत. दरम्यान, ही दगडफेक कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

भास्कर जाधव यांनी मंगळवारी कुडाळ येथे सभा घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घराच्या अंगणात स्टम्प, दगड आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल असण्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या या वस्तूंच्या आधारे हा खरंच हल्ला करण्याचा प्रयत्न होता की आणखीन काही? या दिशेने स्थानिक पोलीस तपास करत आहेत.

Share