मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबईतील सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे मलिकांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे.
काय आहे प्रकरण ?
मुंबईच्या कुर्ला येथील जमीन खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्रीग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची ३ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. ईडीचा आरोप आहे की मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला जमिनीसाठी पैसे दिले. पारकरने ते पैसे दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोप ईडीने केला आहे.