उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. योगी सरकार मधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. खुद्द सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपत प्रवेश केला होता आणि पडरौना विधानसभा क्षेत्रातून ते विजयी झाले होते.

आज उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वत: अखिलेश यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, “सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा.”

दरम्यान निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

Share