नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी पाच पानी पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Congress leader Ghulam Nabi Azad severs all ties with Congress Party pic.twitter.com/RuVvRqGSj5
— ANI (@ANI) August 26, 2022
सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे की, अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझे जुने संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी पक्षनेतृत्वाने देशभर काँग्रेस जोडो यात्रा करावी. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केली आहे. तसंच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले असंही ते म्हणाले आहेत. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचं होतं अशी टीका करताना २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता असा दावा त्यांनी केला आहे.