भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सोनालीसमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

सोनाली फोगाट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं झाला. त्यांनी २००६ मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झालं होतं. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. २०१६ मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईत होत्या.

Share