ठाणे : महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्ज, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा मेळावा पार पडला. या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलीन केली. अन्य नेत्यांबद्दलही अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, या भाषणात ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोप गवस यांनी केला आहे. गवस यांनी तक्रारीमध्ये नेमकी कोणी काय वादग्रस्त वक्तव्य केली, हे देखील नमुद केले आहे. नेत्यांची भाषणे मुख्यमंत्री यांचा अवमान करणारी असल्याचे गवस यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. गवस यांच्या तक्रारीनंतर मंगळवारी कलम १५३, ५००, ५०४ प्रमाणे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.