बुलढाणा : बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्यानंतर आता हा वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यक्रमानंतील राड्यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनीही धमकी दिल्याने शिवसैनिक आणि बंडखोर आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर ” चून चून के गिण गीण के मारे जायंगे, अशी थेट धमकीच बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.” इतकेच नव्हे तर, पोलीस होते म्हणून कालच्या राड्यात कमी झाले, मात्र पुढच्या वेळी आणखी जास्त राडा होईल” असा इशारा ही गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.
बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.