मुंबई- आज नाचणारे, तलवारी चालविणारे, खोटे आरोप करणारे भाजपचे नेते आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ‘ईडी’च्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. नवाब मलिक यांना आत टाकले, ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा ते भाजप व त्यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. २०२४ साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. त्या वेळी नाझी फौजांच्या सरदारांवर खटले चालवून तुरुंगात टाकले जाईल. महाराष्ट्रात एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतविण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे अशा शब्दात शिवसेनेने ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखातून नवाब मलिकांच्या अटकेवर भाष्य केले आहे.
‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात म्हटलंय की, नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे. नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. सत्य बोलणाऱ्यांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.
भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण त्यांनी इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. फडणवीस यांनी तर मलिक यांना जेलमध्ये पाठविण्याचा पणच केला होता. फडणवीस म्हणतात, मलिक यांनी देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केलाच कसा? हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत, इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपवून ठेवले आहे, पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी व मिठी मारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. नवाज शरीफ यांच्याच काळात कारगील झाले होते. कश्मीरात आजही हत्यासत्र सुरू आहे व चीनचे घुसखोर मोदी सरकारला बाहेर काढता येत नाहीत. हीसुद्धा दुश्मनांशी हातमिळवणीच आहे. गुजरातमध्ये ऋषी अगरवाल नामक माणसाने राष्ट्रीय बँकांना २३ हजार कोटींना लुबाडले हीसुद्धा देशाशी दुश्मनी आहे. त्या अगरवालला वाचविणारे दाऊदपेक्षा मोठे असेच देशाचे दुश्मन आहेत. त्यावर कोणीच का बोलत नाही? नवाब मलिक यांना ज्या प्रकरणात अडकविले आहे, त्याचा फैसला न्यायालयात होईल. देशातला कायदा मेलेला नाही व जनता झोपलेली नाही हे उद्या कळेल.
हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून दाऊदला मारा, नाहीतर फरफटत हिंदुस्थानात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सी या भगोडय़ास आणू शकले नाहीत, तेथे दाऊदचे काय? केंद्रीय तपास यंत्रणांना आपले गुलाम करून ते मनमानी करीत आहेत. राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहेत. महाराष्ट्रात शरद पवार व त्यांचे कुटुंब, उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंब, संजय राऊत व त्यांचे कुटुंब, अनिल परब, अनिल देशमुख वगैरेंवर बदनामी व खटल्याची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारण? नवाब मलिकांचे प्रकरण मागे पडेल अशी प्रकरणे भाजप नेत्यांच्या खात्यावर जमा आहेत, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.