मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्यासाठीचा आपला पहिला टीझर कालच प्रदर्शित केला होता. यानंतर आता ठाकरे गटाचा पहिला टीझर समोर आला आहे. ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!’ असं कॅप्शन देत ठाकरे गटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे.
काय आहे टीझरमध्ये?
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरची सुरुवात शिवसेनेच्या भगव्या झेंड्यापासून होते. नंतर पुढे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो दिसतो. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि मग निष्ठेचा सागर उसळणार असं लिहिलेलं दिसतं.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
विशेष म्हणजे या ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे सभेसमोर भाषण देतानाचे फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाचे चित्रणही ठळकपणे दाखवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्राची ताकद दिसणार असंही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.