Datta Jayanti 2022: जाणून घ्या दत्तजयंतीचं महत्त्व आणि पूजा विधी

यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला होता. धार्मिक ग्रंथानुसार भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही रूप मानले जाते. दत्ताचे देव आणि गुरू ही दोन्ही प्रकार आहेत, ज्यामुळे त्यांना श्री गुरुदेवदत्त देखील म्हटले जाते.तर भगवान दत्त यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. त्यांच्या नावावरच दत्त संप्रदाय उदयास आला. दक्षिण भारतातही त्यांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी त्यांचे भक्त उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्ताचे व्रत ठेवून त्याची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रावर प्रदोषकाळी भगवान दत्ताचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री जेथे दत्त मंदिर असते त्याठिकाणी या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा साजरा केला जातो. दत्तजयंत्तीच्या निमित्ताने ‘श्री गुरूचरित्र’ या ग्रंथाचे पारायण सामूहिक पद्धतीने किंवा घरोघरी केले जाते. महाराष्ट्रासह दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकासह तामिळनाडूमध्ये दत्तजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

दत्त जन्म कथा
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्त जयंती शुभ मुहूर्त
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रयांनी मनोभावे पूजा केली जाते. ७ डिसेंबरला सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला सुरुवात होईल आणि ८ डिसेंबरला ९ वाजून ३८ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार दत्त जयंती ७ डिसेंबरला साजरी केली जाईल. संपूर्ण दिवस दत्त प्रभूंचं व्रत, पूजा, व्रत कथा आणि भजन-किर्तन करु शकता.

अशी करा दत्त जयंतीची पूजा
सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला.
पूजेच्या आधी गंगाजल किंवा पाणी पूजेच्या जागी शिंपडावे आणि त्यावर स्वच्छ आसन ठेवा.
भगवान दत्तात्रयाच्या फोटोला यानंतर फुले, हार इत्यादी अर्पण करा.
धूप, दीप आणि अगरबत्ती लावून मनोभावे दत्ताची उपासना करा.

श्री दत्त आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥

Share