मुंबई : वेदांत आणि फॉक्सकॉन महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांती गुंतवणूक करणार होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९०% चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मविआ सरकारने अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु मविआ सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला?, असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल उपस्थित करत हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?, असे सवालही बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत.
How did the Rs 1.58 lakh crore Foxconn project go to Gujarat? Employment generating projects going to Gujarat, are youth of Maharashtra to just sit here and break dahihandis? Why did Shinde-Fadanavis govt not object to this? Does govt change have to mean neglect of Maharashtra?
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 13, 2022
मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी BJP व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली, याकडेही बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधले. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता, अशा शब्दात राज्याच्या कारभाऱ्यांचे कान टोचले आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.