ईडी सरकारचे १०० दिवस हारतुरे,व खुर्ची वाचवण्यातच गेले – नाना पटोले

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले आहेत. या १०० दिवसांत ‘ईडी’ सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख थेट रोजगार निर्मितीचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घातला, इतर गुंतवणूकही घालवली. गुजरातचे हित जोपसणे व महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता हेच ईडी सरकारने १०० दिवसात केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण अद्याप पंचनामे पार पडलेले नाहीत, थातूरमातूर पंचनामे केले जात आहेत, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली तीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मविआ सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर ५० टक्के कमी करावेत अशी मागणी करणारे आता मूग मिळून गप्प बसले आहेत. सीएनजी पीएनजीवरचे कर मविआ सरकारने कमी केले पण ईडी सरकारने कोणतेही कर कमी केले नाहीत उलट सीएनजी ८४ रुपये किलोपर्यंत वाढवण्याचे काम केले. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही तर गुजरातच्या हितासाठी, दिल्लीच्या आदेशानुसार काम करत आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच या सरकारला काम करू दिले गेले नाही. सातत्याने सरकारच्या कामात खोडा घालणे, राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी लव्ह जिहाद, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा सारखे मुद्दे जाणीवपूर्वक काढले गेले. महाविकास आघाडी सरकार, महाराष्ट्र व मुंबईला बदनाम करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. राजभवनच्या माध्यमातूनही समांतर सरकार चालवले गेले, असा आरोप नाना पटोले भाजपावर केला.

याचबरोबर, कोरोनाच्या संकटातच महाविकास आघाडी सरकारी दोन वर्ष गेली, मात्र जगाला हेवा वाटावा. असे काम कोविड संकटात महाविकास आघाडी सरकारने केले. पण ते सरकार पाडण्यातच विरोधक व्यस्त होते. शेवटी कटकारस्थान करून ईडी सरकार आले आणि सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारच खुलेआमपणे हातपाय तोड्याची भाषा करू लागले, पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकावण्याची भाषा सुरु झाली. दादरमध्ये गणेशोत्सव काळात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने गोळीबार केला. पण यापैकी एकाही घटनेत कायदेशीर कारवाई करुन सरकारी गुंडगिरीला चाप लावला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Share