मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेनला सर्वप्रथम खिंडार पाडणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शितल म्हात्रे या मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर २४ तास उलटत नाही तोच शिवसेनेने शीतल म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह असलेल्या अनेकांनी त्यांची साथ सोडून ते शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला गेलेल्या आमदारांमध्ये संतोष बांगर यांचा समावेश नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी मी निष्ठावान असून बंडखोर आमदरांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. अशाच प्रकारे बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुंगण म्हणत सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या दहीसर येथील प्रभाग क्रमांक सातच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे देखील शिंदे गटात सामील झाल्या आहेत.
कोण आहेत शीतल म्हात्रे?
शितल म्हात्रे शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या. उत्तर मुंबईतील दहिसरच्या वॉर्ड नंबर ८ मधून दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. शिवसेनेच्या पदाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली. २०१२ मध्ये त्या पहिल्यांदा निवडणूक जिंकल्या. त्यानंतर २०१७ मध्येही त्या मुंबई महानगरपालिकेत निवडून गेल्या होत्या. शिवसेनेच्या मुंबईतील एक आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. अलिबाग-पेण संपर्क संघटक म्हणूनही त्यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली होती.