फडणवीस लवकर बरे व्हा; संजय राऊतांचं ट्विट

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी.  सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांच्या या ट्वीटनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राजकीय मतभेद विसरून फडणवीसांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ‘काळजी घ्या. आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो! जय महाराष्ट्र!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

दरम्यान दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आवर्जून वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही आता ७०० च्या आसपास जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशपातळीवरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही कोरोनाची लागणी झाली होती.

Share