मुंबई : माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना शिंदे गटात उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कृष्णा हेगडे कोण आहेत?
कृष्णा हेगडे यांचा मुंबईतील विले पार्ले भागात प्रभाव आहे. हेगडे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये भाजपमधून शिवसेनेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.मात्र, दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी शिवबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
कृष्णा हेगडे यांचा प्रभाव मुंबईतील विले पार्ले भागात आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाल्यानं कृष्णा हेगडे यांनी नवा मार्ग स्वीकारला होता. हेगडेंनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी भाजप प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसानंतर हेगडेंनी भाजपची साथ सोडून शिवसेनेची वाट धरली होती.