मुंबई : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली. यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं की, सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे.
सत्तेविना मती गेली,
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. मात्र शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युतीची आज घोषणा झाली असून प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेसोबत का युती केली, याचं कारण संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलं आहे. या युतीवरूनच पाटील यांनी ट्विट केल्याचं बोललं जात आहे.