मुंबई : गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणतेही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. त्यामुळे यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. त्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवप्रेमींना दिलासा देत शिवजयंतीसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
छत्रपती #शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त (दि.१९) आयोजित करण्यात येणाऱ्या #शिवज्योत दौडीत २००, तर जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून जन्मोत्सव साजरा करावा- गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांची मान्यता#ShivajiMaharaj pic.twitter.com/d9JfceiSqA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 14, 2022
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.