मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. यावर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केलं आहे.
नेमक काय म्हणाले हसन मुश्रीफ?
आज सकाळपसून माझ्या घरावर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. माझ्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. मी काही कामानिमित्त बाहेर आहे, त्यामुळे मला ही सर्व माहिती फोनवरूनच मिळाली. मी प्रसारमाध्यमांद्वारे असं ऐकत आहे की, माझ्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे. परंतु मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांत राहावं. कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
#कार्यकर्त्यांनी_प्रशासनाला_सहकार्य_करा…#शांतता_राखा…@ncpspeakshttps://t.co/sHqw1uPdPW
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) January 11, 2023
दरम्यान दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. दीड वर्षांपूर्वीच इडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तेव्हा हाती काहीच लागलं नाही? मग आता पुन्हा माझ्यावर कारवाई कशासाठी असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजपचे कागल तालुक्यातील एक नेते माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी वारंवार दिल्लीला चकरा मारत होते. त्यांचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना उघडपणे सांगत होते की आता मुश्रीफांवर कारवाई होणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. हे सर्व गलीच्छ राजकारण असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.