पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल शिरुर येथील रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. त्यांनतर पवार भाषण करण्यासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी मी अजून म्हतारा झालो नाही असं मिश्किलपणे म्हटलं. या वक्तव्याने उपस्थितांनीही टाळ्या वाजवत पवारांच्या वक्तव्याला दुजोराच दिला.
मी आयोजकांवर नाराज आहे. माझी त्यांच्यावर नाराजी आहे. आयोजक बोले की या वयात.. मी काही अजून म्हातारा झालेलो नाही. असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी यावेळी विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की, कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत असल्याचा आनंदही आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा क्षेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करतो.
दरम्यान दोन दिवसापुर्वीच उस्मानाबादमध्ये पक्षाच्या मेळाव्या दरम्यान बोलत असतांना शरद पवार म्हणाले होते की, सतत ५२ वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. त्या समाजाचे आणि लोकांचे भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी असून चार चार वेळा मला मुख्यमंत्री करण्यात आलं. ८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असे पवार यावेळी म्हणाले.