मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/4tsNKkQDJE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 14, 2022
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
अपघात नेमका कसा झाला?
विनायक मेटे यांच्या गाडीला पहाटे ५ : ३० वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील खालापूर टोलनाका येथे अपघात झाला. भरधाव ट्रकने मेटे यांच्या कारला दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांनी याबाबत बोलताना एक शंका उपस्थित केली आहे. ‘बीडहून मुंबईकडे निघालेल्या विनायक मेटेंचा रात्रभर प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे होते. माझ्या अंदाजानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात झाला असावा,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.