औरंगाबाद : शहरातील गारखेडा परिसरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मनोविकृत बापाने स्वत:च्याच मुलीवर तब्बल अकरा वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ४० वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, १७ वर्षीय पिडीता आई, लहान भाऊ व वडिलांसह गारखेडा परिसरात राहते. ती बारावीला शिकत होती. तर ट्युशनसाठी ती मुकुंदवाडी परिसरात जायची. २६ मे रोजी शिकवणीला गेलेली पिडीता मात्र घरी परतलीच नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने मुकुंदवाडी पोलिसांकडे तक्रार केली. यावेळी पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पथके रवाना केले. पोलिसांना ती सापडल्यानंतर तिला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. निरीक्षक गिरी यांना पिडीता अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यांनी महिला अधिकाऱ्यांना बोलावून विश्वासात घेऊन तिची विचारपुस केली. तेव्हा पिडीतेने सर्व आपबिती सांगितली. वडीलच आपल्यावर ११ वर्षांपासून अत्याचार करीत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. आणि याच त्रासाला कंटाळून आपण पळून गेल्याचेही तिने सांगितले.
अवघ्या ६ वर्षाची असताना बापाची वाईट नजर तिच्यावर पडली होती. तेंव्हापासून जन्मदाता बापच लैंगिक अत्याचार करीत होता. तब्बल ११ वर्षे या नरकयातना तिने निमूटपणे सहन केल्या. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छेविरुद्ध युवतीवर अत्याचार केला. त्यामुळे पिडीतेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हे प्रकरण पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने झिरो ने तो वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली आहे.