औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, लोकसभा निवडणुकीत भाजपकडून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला एक हजार कोटी रुपये देण्यात आले होते, असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे. आपल्याला १ हजार नाही, तर १० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे पैसै शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच आम्हाला आणून दिले होते. मात्र त्यातील दोन हजार त्यांच्याकडेच शिल्लक असून ते कधी परत करणार याची वाट पाहत असल्याचा खोचक टोला जलील यांनी खैरेंना लगावला आहे. ते बुधवारी औरंगाबादमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना जलील म्हणाले, चंद्रकांत खैरे यांना आम्ही एन्जॉय करतोय. खैरे हे औरंगाबादसाठी एंटरटेनमेंट फॅक्टर झाले आहेत. जेव्हा खैरे बोलायला सुरुवात करतात तेव्हा लोकं एंटरटेनमेंट म्हणून घेतात. त्यामुळे मी कधीही त्यांना महत्वाचं समजलं नाही. एक हजार कोटी रुपये दिल्याचे आरोप करणाऱ्या खैरेंनी ईडीला पत्र लिहून भाजपकडे हे पैसे कुठून आले होते याची चौकशी करण्याची मागणी करावी, असेही जलील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ८ जूनला औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा आहे. या दिवशी त्यांनी औरंगाबादला पाणी कधी मिळणार, यांची घोषणा करावी. त्यांनी पाण्याची घोषणा केल्यास मी स्वतः त्यांचा जाहीर सत्कार करेल असं देखील जलील म्हणाले.