सातारा- ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता.
बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असुन 1/2 pic.twitter.com/C62NKA3moP
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 3, 2022
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.
महिला आयोगानेही बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची दखल घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितलं होतं. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आला . गुरुवारी पोलिसांनी बंडातात्यांच्या दोन्ही मठांवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यानंतर शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि मठातून ताब्यात घेतलं. साताऱ्यातील फलटण करवडी येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांना साताऱ्याकडे नेलं जाणार आहे.