लातुर : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लातूर शहरातल्या जुन्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण कक्षाची वेळ वाढवून ८ तासावरून १२ तास करण्यात आली आहे. शहरातील विद्यार्थी ,व्यापारी ,उद्योजक , सैन्य दलातील कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबरच पर राज्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांच्या सोयीसाठी रेल्वे आरक्षणाची वेळ ८ तासावरून २ शिफ्टमध्ये १२ तासापर्यंत करण्यात यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
दरम्यान, खासदार सुधाकर श्रृंगारे यांनीही प्रशासनाकडे आरक्षण कक्षाची वेळ वाढवावी, अशी मागणी केली होती. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आरक्षण केंद्र सुरू राहणार आहे, असे आदेश रेल्वे प्रशासनाने काढले असून आरक्षणासाठी रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा प्रवाशांचा खर्च वाचणार आहे. प्रवाशांना आरक्षणाची सोय तेस शहरातच मिळणार आहे.
लातूर सिटी पीआरएस (रेल्वे प्रवासी आरक्षण) आता सकाळी 8 ते रात्री 8 असे बारा तास सलग दोन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. लातूर शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षणाची वेळ वाढवून देण्याची मागणी मी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. या मागणीस यश आले आहे. pic.twitter.com/JB5r7rq4EO
— Sudhakar Shrangare (@mpsshrangare) December 13, 2022
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिलांना आरक्षणासाठी स्टेशनवर जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता शहरातच वेळ वाढवून दिल्याने रात्री ८ वाजेपर्यंत आरक्षण काढता येणार आहे. यापूर्वी जुन्या रेल्वे स्टेशनवर आरक्षण कक्षाची वेळ सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी चार ते आठ होती, आता सकाळी ८ ते रात्री ८ असा १२ तास कक्ष सुरू राहणार आहे.