पंढरपुर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा. pic.twitter.com/0E0R0geU9k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 10, 2022
मुख्यमंत्री सहकुटुंब हजर
विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.