औरंगाबाद : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काल दुपारी संजय शिरसाट यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयातील डॉक्टरांनी संजय शिरसाट यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. यानुसार, संजय शिरसाट यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे.
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वप्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये संजय शिरसाट यांचा समावेश होता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिरसाट यांना संधी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने संजय शिरसाट प्रचंड संतापले होते. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलाच आहे. त्यामुळे संजय शिरसाट हे अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यांनी भर बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. संजय शिरसाट हे २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत.