मनसेने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी,रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उत्तर प्रदेशातील भाजचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा एकाच व्यासपीठावरील फोटो शेअर करत मनसे नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातून राष्ट्रवादीने मदत केल्याचा आरोप या फोटोंद्वारे करण्यात आला आहे. या मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून राजकारण रंगलेलं असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट मध्ये म्हटलं, “राज ठाकेर साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करुन घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

शरद पवारांच्या फोटोबद्दल बोलताना रोहित पवार म्हणतात, शरद पवार साहेब आणि खा. बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा…. तर पवार साहेब हे अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत आणि खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत… मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल. असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपचे अनेक नेते राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं समर्थन करत असताना या दौऱ्याला आक्रमक विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना ताकद कुणी दिली, यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बृजभूषण यांच्या आधारे भाजप नेतृत्वानेच राज ठाकरेंचं खच्चीकरण केल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, मनसेने मात्र शरद पवार यांच्याकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळत आहे.

Share