मुंबई : आगामी मुंबई-ठाणे व पुण्यासह अन्य ठिकाणी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाटी मनसे सोबत युती होऊन भाजप त्यांच्यासाठी जागा सोडणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार असल्याची माहिती देखील संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
युती हा जर तर चा विषय
तसेच, आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. आमचा विदर्भाचा दौरा सुरू होतोय. पक्ष वाढीसाठी हा आमचा दौरा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.