सोनिया गांधी व राहुल गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

शिर्डी : केंद्रातील भाजपाचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भिती दाखविली जात आहे. उदयपुर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही, असा इशारा प्रभारी एच. के. पाटील यांनी दिला आहे.शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, संपतकुमार, सोनल पटेल, कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लातूरचे अभय साळुंके, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन चौगुले, राजाराम पानगव्हाणे, डॉ तुषार शेवाळे सो दुर्गाताई तांबे यांच्यासह अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप हा धर्म भ्रष्ट करत आहे

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या विचारातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती त्या देशात रॉकेटची निर्मिती होऊ लागली, भारत महासत्ता बनण्याचे काम काँग्रेसने केले. मात्र धर्माचे बाजारीकरण करून देशामध्ये तेढ निर्माण करणारा भाजप हा धर्म भ्रष्ट करत आहे. सध्या भाजपा सरकार हे दररोज देशाची मालमत्ता दोन उद्योगपतींना विकत आहे भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या सन्मान मोदी सरकारने कमी केला आहे. केंद्र सरकार सातत्याने खोटे बोलत असून दररोज देशातील विविध सार्वजनिक उपक्रम विक्रीला काढत आहेत. देशात फक्त दोनच भांडवलदार मोठे होत आहेत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला सन्मान कमी करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले असून देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे भारत जोडो अभियान हाती घेतली आहे.

मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीयतेचे राजकारण

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशात महागाई भयंकर वाढली आहे. पेट्रोल-डिझेल गॅसचे दर वाढलेले आहेत. बेरोजगारीची भीषण समस्या आहे. या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजपकडून जातीयतेचे राजकारण केले जात आहे. दररोज नवनवीन विषय काढून बनवाबनवी केली जात आहे. मात्र या सर्वांना काँग्रेस भारत जोडो अभियानातून उत्तर देणार आहे. इंदिराजींच्या देहाची चाळण झाली त्यामुळे त्यांचा मृतदेह मांडीवर घेणाऱ्या सोनियाजी,पती राजीवजी यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या त्यावेळी देशाला सावरणाऱ्या सोनियाजी. देशासाठी त्याग केलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या परिवाराचा छळ करण्याचे काम भाजप करत आहे .मात्र त्याला जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले .संकल्प शिबिरातून पुढील शंभर दिवसाचे कार्यक्रम दिला असून तो तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

भारत जोडो अभियानातून काँग्रेस अधिक बळकट होईल

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नष्ट होतात की काय असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. केंद्र सरकार अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी ते धार्मिक प्रश्न उपस्थित करत आहेत .ज्ञानवापी , हनुमान चालीसा या प्रश्नांपेक्षा बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत .या शिबिरात इव्हीएम आम्हाला नको असून मतपत्रिका द्या  असे सांगताना भारत जोडो अभियानातून काँग्रेस अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Share