पुणे : शिवसेनेतील बंडानंतर ५० खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात झाली आणि पुढे त्यावरून शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं. मात्र यावरून आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे चांगालेच आक्रमक झाले आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ५० खोक्यांच्या आरोपांप्रकरणी आरोप सिद्ध करण्याचे किंवा माफी मागण्याचं आवाहन शिवतारे यांनी केलं आहे.माफी न मागितल्यास तिघांविरोधात २५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकू, तसेच याबाबत त्यांना नोटीस देखील पाठवली जाईल, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.
१९७८ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी शरद पवारांनी सरकार स्थापन करण्यासाठी ३८ आमदार फोडले होते. त्यावेळी शरद पवारांनी किती खोके दिले हे देखील आम्हाला सुप्रिया सुळेंनी आम्हाला सांगावे, असा टोला विजय शिवतारे यांनी लगावला. तसेच पहाटेच्या शपथविधी वेळी अजित पवारांनी किती खोके घेतले. हे देखील विचारून सांगा, असंही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी विजय शिवतारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. त्यामुळे शिवतारे है आता शिंदे गटाची आवाज ठारणार आहेत. शिवसेनेतून शिवतारेंची हकालपट्टी झाल्यानंतर एकप्रकारे त्यांचे शिंदे गटाकडून पुनर्वसन करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.