मुंबई : मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात, असे निर्देशही दिले आहेत.
आतापर्यंत मृतांचा आकडा १७ वर, आकडा वाढण्याची शक्यता
कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग सोमवारी रात्री ११.५० च्या सुमारास कोसळला. तळमजला अधिक तीन मजले अशी चार मजली इमारत आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याकडून शोध मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत एकूण २३ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे.