मुंबई : जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी १२ च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुलोचना यांनी मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी याभाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी स्वत:ला समाजकार्यातही झोकून दिले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा त्या धार्मिक संस्थांना देत असे. तसेच कार्यक्रम व पुरस्कारांतून मिळणाऱ्या रकमेचा काही हिस्सा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. लावणीचा बाज आणि त्याची लोकप्रियता सुलोचना यांच्यामुळे टिकून राहिली असल्याचं म्हटलं जातं. सुलोचना चव्हाण यांनी ‘माझे गाणे माझे जगणे’ हे आत्मचरित्र लिहिले असून लावणीच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यात आहेत.