शिवसेनेतून हकालपट्टीचं सत्र सुरुच! आता उदय सामंत आणि यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेही अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात आता शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाच्या उपनेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मंत्री उदय सामंत आणि आमदार यशवंत जाधव हे शिंदे गटात सामील झाले होते. मागील काही दिवसांपासून उदय सामंत यांनी उघडपणे शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अधिवेशनामध्ये उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेनं अखेरीस कारवाई केली आहे.

यशवंत जाधव आणि उदय सामंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Share