उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदार करणार भाजपात प्रवेश

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार अवधूत तटकरे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित तटकरे भाजप प्रवेश करणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

कोण आहेत अवधूत तटकरे?

अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करतील. एकीकडे कोकणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे. मात्र दुसरीकडे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार अवधूत तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

Share