मुंबई : सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करून त्यांना योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 24, 2022
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.
प्रसिद्ध धार्मिकस्थळ असलेल्या गाणगापूर डेपोच्या एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाल्याची रविवारी सकाळी घडली. अक्कलकोट- मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत ही बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पलटी झाली. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी जवळपास ३५ते ३६ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. जखमींच्या प्रकृतीबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली आहे.