सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका

मुंबई : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यथ मिळालं. पाच पैकी चार राज्यात भाजपचा बोलबाला असल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर पाच राज्यातील निकालांवरून शिवसेना खा. संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते हुकूम मानतात का?, असा सवालही केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटलं की, राजेश्वर सिंह हे ईडीचे जाॅइट डायरेक्टर तडकाफडकी ऐच्छिक सेवानिवृत्ची घेतात आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लखनौमधून निवडून येतात. पदावर असताना याच अधिकाऱ्याने ऑगस्टा वेस्टलॅण्डपासून टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा, एअरसेल-मॅक्सिस प्रकरणापर्यंत अनेक घोटाळय़ांचा तपास केला आहे व या घोटाळ्यावरून भाजपने काँग्रेससह इतर विरोधकांवर शिंतोडे उडवले आहेत. म्हणजे ‘ईडी’सारख्या संवेदनशील सरकारी सेवेत असताना हे अधिकारी सत्ताधारी पक्षाचे हुकूम मानतात काय? असा प्रश्न निर्माण होतो.

तसेच सुशिक्षितांनी राजकारणात यायलाच हवे. यापूर्वी अनेक बडे नोकरशहा राजकारणात येऊन उच्चपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपात जाऊन कोणी निवडणुका लढवल्या हा गुन्हा नाही. प्रश्न इतकाच आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांत एकपक्षीय राजकारण घुसले आहे. तपास यंत्रणांतील लोकांचा राजकीय प्यादी म्हणून वापर होऊ लागला तर देशातील न्यायव्यवस्था, प्रशासन हे दोन प्रमुख स्तंभच कोसळून जातील. लोकशाहीचे हे दोन प्रमुख स्तंभ राजकीय प्यादी किंवा हस्तक म्हणून वापरले जाऊ लागले तर निवडणुका लढविण्यात काहीच अर्थ राहणार नाही. असेही राऊत म्हणाले आहेत.

Share