मुंबई : मराठवाडा मुक्ती दिनावरुन राज्यात पुन्हा शिवसेना व शिंदे सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले पत्र लिहीले आहे. यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं की, मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही,असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!#MarathwadaMuktiSangram pic.twitter.com/T7qnjdH3FS
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2022
ते पुढे म्हणतात, माझं तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.