आरोग्यमंत्र्यांना जिल्हा सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार

मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा भोंगळ कारभार थेट केंद्रीय सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उघड केला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात औषधाचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयातून औषध खरेदी करण्याची सूचना रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अशा आरोग्य मंत्र्यांना त्यांचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळू शकतील, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री जर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जाऊन रूग्णालयाची व्यथा पाहत असतील तर राज्याच्या इतर व दुर्गम भागातील जनतेचे आरोग्य अशा अकार्यक्षम मंत्र्यांकडून कसे सुधारले जाईल. ही पोलखोल केवळ आरोग्य मंत्र्यांची नाही तर संपूर्ण राज्य सरकारची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

एका जबाबदार पदाची जाणीव कोणा व्यक्तीला होत नसेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तानाजी सावंत यांच्यासारख्या अतिशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्वाला पायउतार करून राज्याला सक्षम व योग्य सार्वजनिक आरोग्य मंत्री मिळायला हवा, हे केंद्रीय मंत्र्यांच्या आजच्या भूमिकेतून स्पष्ट झाले, असे मत राष्ट्रवादीने व्यक्त केले आहे.

दरम्यान,राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणांना अनेक समस्या भेडसावत आहेत, तर अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात रुग्नालयांना भेटी दिल्या. औषधांच्या टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ.भारती पवार जिल्हा रुग्णालयात औषधे घेणाऱ्या रुग्णांच्या रांगेत उभ्या राहिल्या. तेथे त्यांनी औषधांच्या उपलब्धतेची स्थिती प्रत्यक्ष अनुभवली. जिल्ह्यात औषधांचा तुटवडा असल्याचे त्यांना जाणवले.

Share