पुणे : महाप्रबोधन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाण्यात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, अनिता बिर्ज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईल. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल,” असेही अंधारे यांनी स्पष्ट केलं. तसेच, जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत. असही सुषमा अंधारे म्हणाल्या.