सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे तरी लागणार नाही; भरत गोगावलेंचा दावा

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्षे तरी लागणार नाही असं भाकित शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण ही निशाणी देखील शिंदे गटालाच मिळणार, असा दावाही गोगावले यांनी केला आहे. कर्जत येथे रविवारी शिंदे गटाने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार भरत गोगावले म्हणाले की, अनेक लोकांनी देव पाण्यात बुडवले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल, शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर आमचे सरकार कोसळेल, अशी आस अनेकजण लावून बसले आहेत. पण तुम्हाला मी सांगतो की, आपली तक्रार घटनापीठाकडे गेली आहे. हे आता जवळजवळ चार ते पाच वर्षे चालणार आहे. दुसरी निवडणूक जिंकून आपण पुन्हा सत्तेत येऊ, असे भरत गोगावले यांनी म्हटले. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरत नाहीत तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार हे सुरळीत चालू राहणार. शिंदे-फडणवीस सत्ता कायम राहिली तर भविष्यात शिवसेनेची आणखी पडझड होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली जात आहे. मात्र या प्रकरणात अनेक घटनात्मक पेचही आहेत. हा गुंता सोडवण्यासाठी न्यायालयाकडून पाच सदस्यीय घटनापीठ नेमण्यात आले आहे. आता हे घटनापीठ कधी सुनावणी घेणार आणि काय निकाल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच आता दसरा मेळाव्यावरुनही शिवसेना विरुद्ध शिंदे गटाचा सामना रंगला आहे.

Share