औरंगाबाद : मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिवसांपासून थरारक चित्रपट आलेला नाही. नेहमीच्या त्याच त्या लव्ह स्टोरी वर आधारीत चित्रपट पाहून प्रेक्षकही कंटाळले असताना आता ‘वाय’ (Y) हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या २४ जूनपासून येत आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी या चित्रपटाची टीम आज औरंगाबादमध्ये दाखल झाली होती. यावेळी पत्रकार परिषदेत या चित्रपटाबद्दल माहिती देण्यात आली.
मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे, जी सत्य घटनांवर आधारित आहे. ‘वाय’चा पहिला लुक समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता ‘वाय’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत; ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. यात तिला यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.
या चित्रपटात मुक्तासोबत प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकार असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर वरून दिसून येत असल्याने; मराठीतील हा एक मल्टी-स्टारर चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. मन हेलावून टाकणारा असा हा चित्रपट आहे.
दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात, ‘’ ‘वाय’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’
मुक्ता बर्वे म्हणतात, अनेक दिवसांनी मराठीमध्ये अश्याप्रकारचा चित्रपट येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं शुटींग हे लातूरमध्येच झाले आहे. आणि चित्रपटातही मराठवाड्यातील लहेजा मध्येच सगळे डायलॉग्ज बोललेली आहे. तसेच सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना या घटना आपण नेहमीच आपल्या आजुबाजूला अनुभवत असल्याची जाणीव आपल्याला होईल.