दिल्लीः गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास ८.१२ वाजता निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता दीदींच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती, मात्र शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
Two-day national mourning to be observed in memory of Lata Mangeshkar. The National flag to fly at half-mast for two days, as a mark of respect: Govt sources
— ANI (@ANI) February 6, 2022
राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असते. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.
राष्ट्रीय दुखवटा आतापर्यंत कोणा कोणाला जाहीर झाला
- २०१३ – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.
- २०१८ – द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
- २०१८ – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
- २०१९ – गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
- २०२० – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.