मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काल रात्री शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरण्यासही ठाकरे गट आणि शिंदे गटाला अंतरीम मनाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुढील संघर्षास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टला शिवसैनिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचेही शिवसैनिकांनी या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे. शिवसेना संघर्षातून तयार झाली असून यापुढेही ती संघर्षातून पुढे जाणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
तसेच, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर सडकून टिका केली आहे.”खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते,” असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गटात आजही बैठका सुरू राहण्याची शक्यता आहे. वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाची बैठक सुरू होती. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकरदेखील उपस्थित होते.