देशाच्या प्रमुख संविधानिक पदांवर काम करीत असलेल्या किंवा केलेल्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तत्काळ सूचना देण्यात येतात. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय दुखवटा काय असतो?
भारतरत्नाने सन्मानित एखाद्या व्यक्तिचं निधन झालं तर ती देशाची मोठी हानी मानल्या जाते. त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती याची घोषणा करायचे. मात्र आता राज्य सरकारेही राजकीय शोक जाहीर करत असतात. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय ध्वज संहितेच्यानुसार संसद, सचिवालय, विधानसभा आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय भवन आणि सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो. या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम केले जात नाहीत.
कोण घेतं निर्णय?
केंद्र पातळीवर केंद्रीय गहमंत्रालय यासंदर्भातील निर्देश जारी करते. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा जाहीर करु शकतात. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर…
- ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
- राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
- सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
- शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
- अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.
कधी कधी जाहीर करण्यात आला राष्ट्रीय दुखवटा?
२०१३ – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर भारतात पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.
२०१८ – द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
२०१८ – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
२०१९ – गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
२०२० – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
२०२१ _ गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.