सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे; भाजपची ठाकरेंवर टिका

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक झटके बसले आहेत. ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. याच घडामोडींवरून भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी गजानन किर्तिकरांसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते शिवसेना सोडून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वाक्यात ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळे सोडून गेले की हे फोटोग्राफी करायला मोकळे…, असे खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

 

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किर्तिकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. गजानन आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. त्यांचे पुत्र मात्र आमच्यासोबत राहिले आहेत. किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा यासाठी होते. ते गेल्यामुळे फार काही नुकसान झालेले नाही. उद्यापासून त्यांना लोक विसरतील, असंही संजय राऊत म्हणाले.

Share